गेली दहा-पंधरा वर्षे या माणसाला फक्त शेतात आणि लोकांच्या घरचे बागकाम करतांना बघितलं आहे, त्यांच नाव काय हेही कधी कळलं नाही. सगळे “बहिरा” म्हणून हाक मारतात कारण त्यांना ऐकू येत नाही. जातीने मुसलमान पण मराठी, हिंदी काहीही बोला ते तुमच्या हावभाव आणि ओठांच्या हालचाली वरून सहज ओळखून घेतात. यांच्या बोलण्यात वागण्यात नम्रपणा अगदी भरभरून जाणवतो, आपल्या पेक्षा लहान मुलाला ही ते ‘आप’ म्हणूनच बोलतात.
हळू हळू कळलं की बहिरे काका आमच्या कॉलनी शेजारच्या छोट्याश्या गावात राहतात, त्यांची बायको व मुलांचं छोटंसं कुटुंब आहे, बाजूच्या शुक्लाजींच्या शेतात काम करून आपल घर चालवतात. ऐकू येत नसलं तरी वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्याला हात वर करून ” आदाब !!” म्हणतात.
कामाची पद्धत ठरलेली, हातात नेहमी एक वीळा आणि अंगावर पांढरा (थोडीशी नीळ दिलेला) सदरा आणि पायजामा, केस नीटनेटके, उंची आणि अंगकाठी थोडी कमीच.
बहिरे काकांचा शेतात जायचा रस्ता आमच्या घरासमोरूनच, मीही दिवाळीला घरी गेलो होतो, माझी मुलगी रोज अंगणात खेळतांना त्यांना दिसायची, एक दोनदा मला “आदाब !! ही करून झाला. एक दिवस शेतातून घरी जाताना ते घरी आले, गेटच्या बाहेरूनच मला खुणावून बोलवलं..
पायजाम्याच्या दोन्ही खिशात गच्चं भरलेली “बोरं” आणि तुरीच्या शेंगा त्यांनी बाहेर काढल्या सोबतच (रुपयाला दोन येणारे) संत्रागोळी चॉकलेट्स (सकाळीच घेऊन ठेवली असावीत) सुद्धा दिले आणि वरून एक ‘दहा रुपयांची नोट’ माझ्या हातावर ठेऊन इशारा करत “नाती के लिये खाऊ” असं स्मितहास्य करत बोलले.
त्या गरीब कष्टाळू माणसाच्या मनाची श्रीमंती पाहून मन भरून आलं होत, शब्दच निघत नव्हते…वर्षातून एक-दोन दा पुण्यातून घरी येणारा ‘मी’ बहिऱ्या काकांचं निरीक्षण आणि प्रेम पाहून थोडासा स्तब्ध झालो होतो.
लगेचच त्यांना घरात बोलावलं, आई ने दिवाळीचा फराळ दिला. त्यांनी ही आपुलकीने शांतपणे बसून तो खाल्ला आणि पाणी पिले, लगेच उठून “आता हूँ” म्हणून जायला लागले. त्यांना बघून माणसातली माणुसकी आणि माणसातला देव बघून मन धन्य झाले. शहरात सिमेंटच्या जंगलात अशी देव माणसे दिसणेही कठीण आहे. कशाचीच अपेक्षा नाही, न कशाचा गर्व, जाती-पातीच्या पलीकडची माणुसकी हा अवलिया शिकवून गेला.
या लेखावरून आपल्याला माणुसकी म्हणजे नेमकं काय हे कळलं असेल ही अपेक्षा!
धन्यवाद!
लेखक : संदिप वानखेडे
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
