जमशेदजी टाटा आणि दोराबजी टाटा, ह्यांनी अथक परिश्रम घेऊन टाटा समुचाचा पाया रचला, त्यावर शिखर आणि कळस चढवला तो भारतरत्न जेआरडी टाटा ह्यांनी!
कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसात जेआरडी खचलेले दिसायचे, एका मागोमाग एक सर्व प्रिय व्यक्तींचा मृत्यु आणि लागोपाठ येणारं आजारपण ह्यांने तर त्यांना छळलेच होते, पण आपल्यानंतर टाटा समुह प्रामाणिकपणे आणि वेगाने प्रगतीपथावर नेईल, असा सक्षम वारसदार त्यांना कित्येक वर्ष शोधुनही सापडत नव्हता, टाटा सन्स ह्या मुख्य कंपनीचे अध्यक्षपद त्यांनी पन्नासहुन अधिक वर्ष यशस्वीपणे सांभाळले, सन १९९१ मध्ये समुहाच्या ऐंशी कंपन्या वर्षाला दहा हजार सहाशे सत्तावीस कोटी रुपयांचा टर्नओव्हर करत होत्या, जेआरडींचा उत्तराधिकारी कोण असेल? टाटा स्टीलला नंबर एक वर नेऊन ठेवणारे रुसी मोदी, का टाटामोटर्सचा जगात डंका वाजवणारे सुमंत मुळगावकर?
टाटा ग्रुपच्या सिमेंट कंपन्या सांभाळणारे प्रख्यात वकील नानी पालखीवाला की टाटा टी, टाटा केमीकल्सचा पसारा एकहाती बघणारे दरबारी सेठ?
वेगवेगळे अंदाज, आडाखे बांधण्यात येत होते, एकाहुन एक दिग्गज लोकांकडुन टाटा सन्सच्या प्रमुखपदावर नियुक्त होण्यासाठी जे आर डी कडे लॉबिंग करण्यात येत होती, पण जेव्हा जेह उर्फ जेआरडी टाटांनी आपला उत्तराधिकारी म्हणुन रतन नवल टाटा ह्या तुलनेने नवख्या तरुणाची निवड केली, रतन टाटाच्या निवडीवेळी ते म्हणाले, “हा तरुण माझ्यापेक्षा जास्त शिक्षित आहे, म्हणुण तो एक चांगला नियंत्रक सिद्ध होईल.”
तेव्हा सगळे उद्योगविश्व स्तब्ध आणि चकित झाले, सगळे मोठमोठे दिग्गज तर बुचकळयातच पडले, रतन टाटांच्या निवडीमुळे अनेक लोक नाराज होते, साहजिकच त्यांच्या क्षमतेबद्द्ल शंका घेण्यात येऊ लागल्या, रतन टाटांच्या विरोधात अनेक आवाज उठु लागले होते, पण त्याच रतन टाटांच्या बुद्धी आणि नेतृत्वक्षमतेवर शंभरटक्के विश्वास ठेऊन, निर्धास्त मनाने जेआरडींनी पुढच्या दिडच वर्षांनी जगाचा निरोप घेतला.
रतन टाटांचा राज्याभिषेक झाला खरा, पण सिंहासनावर बसवतानाच, त्यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट ठेवण्यात आला होता. हातात समुहाची सुत्रे आली, तेव्हा परिस्थिती खुपच स्फोटक बनली होती, टाटा ग्रुप अक्षरशः फुटीच्या उंबरठ्यावर उभा होता, सर्व जुणे जाणते, सुभेदार कोणाला न जुमानता, हवी ती मनमानी करत होते, त्याकाळात एकीकडे देशात प्रचंड वेगाने आर्थिक सुधारणा होत होत्या, परमिट राज-लायसन्स राज संपुष्टात येत होता, भारतीय उद्योगक्षेत्र कात टाकत होते, दुसरीकडे टाटा ग्रुपची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली होती, टाटा अजुनही त्याच्या प्रत्येक व्यवसायाचा जायंटच होता, पण त्याची नवनिर्मितीची धार बोथट झाली होती, तो समुह एका डुलत डुलत, रमतगमत चालणार्या, सुस्तावलेल्या हत्तीसारखा चालत होता, तडफदार नेतृत्वाच्या अभावी म्हणा, किंवा योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे म्हणा, समुहाच्या कर्मचार्यांमध्ये सरकारी यंत्रणामध्ये असते तशी ‘चलता है’ वृत्ती बळावत चालली होती, जेआरडींच्या वेळेस असलेली अनुकुल परिस्थिती रतन टाटा चेअरमन झाल्याबरोबर एकदमच प्रतिकुल झाली होती.
एखाद्या चित्रपटात शोभेल असा नाट्यपुर्ण संघर्ष करुन, एकामागोमाग एक धडाडीचे निर्णय घेत आणि टाटा समुहाला शिस्तीचे वळण लावत, फक्त पुढच्या वीस वर्षात रतन टाटांनी नेत्रदिपक यश मिळवले, त्यांनी कंपनी समुहाला भारतातच नाही, तर जगामध्ये पुन्हा एकदा प्रतिष्ठा आणि सन्मानाचे स्थान प्राप्त करुन दिले.
प्रतिकुलतेला अनुकुलतेत परावर्तित करणे रतन टाटांना जमले, ते आपल्यालाही शिकता येईल का? यासाठीच तर त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
१. शिस्त आणि नियंत्रण –
- जेआरडींच्या काळात अनेक उपकंपन्याच्या सुत्रधारांना अवाजवी स्वातंत्र्य मिळाले होते, आणि मॅनेजर जेव्हा स्वतःला मालक समजुन उन्मत्त वागु लागतो, तेव्हा व्यवस्थेत अनागोंदी माजतेच,
- रतन टाटांनी ह्या डोईजड झालेल्या सगळ्या दिग्गजांना विरुद्ध उघड युद्ध पुकारले, उद्योगाची आर्थिक घडी जराही न विस्कटु देता मोठ्या कुशलतेने त्यांनी अवघड ऑपरेशन पार पाडले.
- कंपनीचे हित आणि कठोर निश्चय ह्यांच्या बळावर, चतुराईने त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला.
- आल्याबरोबर त्यांनी एक धडाकेबाज निर्णय घेऊन उपकंपन्यांच्या सर्वच मॅनेजिंग डायरेक्टरचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्ष केले,
- रतन टाटांनी सुत्रे स्वीकारल्यानंतर टाटा सन्सची, बोर्ड ऑफ डायरेक्टरची प्रत्येक सभा वादळी होत होती,
- आतापर्यंत आपली प्रतिष्ठा सांभाळुन असणारा, आणि सगळे वाद पडद्यामागे सोडवणार्या समुहाच्या उच्चपदस्थ व्यक्ती इतिहासात पहिल्यांदाच मिडीयामध्ये जाऊन एकमेकांवर जाहीर आरोप-प्रत्यारोप करत होत्या.
- पण अवघ्या पंधरा महिन्यात रतन टाटांनी अवाढव्य पसरलेला संपुर्ण समुह आपल्या नियंत्रणाखाली आणला.
- आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधीनाकधी वादळं येतात, आव्हानं येतात, आणि भयावह समस्या येतात,
- अशावेळी हातपाय गाळणं, आणि असहाय असल्याचं रडगाणं गात सहानभुती मिळवण्याचा व्यर्थ खटाटोप करणं, जास्त सोप्पं असतं,
- पण रतन टाटा दहा वर्षांनी ह्या प्रसंगावर जेव्हा मनमोकळेपणाने बोलले तेव्हा ते म्हणाले, “प्रसंग कितीही बाका असो, टाटा कधीही मैदान सोडुन पळुन जात नाहीत.”
- पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा मैदान सोडण्याचा विचार मनात येईल तेव्हा प्रत्येक वेळी रतन टाटांचं हे वाक्य आठवा,
- हे टाटापण आपल्या रक्तातही भिनलं तर आपणही नक्कीच टाटासारखा उज्ज्वल इतिहास रचण्यामध्ये नक्कीच यशस्वी होवु.
२. सतत प्रयत्न व असीम धैर्य –
- जेआरडींच्या कार्यकाळातच टाटांच्या शेअर्सची मालकी दुसर्यांकडे जाण्याची सुरुवात झाली होती,
- घनश्यामदास बिर्ला सारखे अनेक उद्योजक टाटांचे शेअर्स खरेदी करुन आपला वाटा वाढवत मागच्या दाराने टाटा समुहावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात होते,
- एकदा तर उद्वेगाने जेआरडी म्हणाले सुद्धा होते, “माझ्याकडे एक असे पद आहे, ज्याच्यावर जितकी जास्त जबाबदारी आहे, प्रत्यक्षात तितकेच कमी अधिकार त्या पदावर असलेल्या व्यक्तीकडे आहेत.”
- रतन टाटांनी ही परिस्थिती बदलली, त्यांनी धोका पत्कारुन एक सुधार केला.
- १९९५ मध्ये टाटा सन्सच्या ग्रुप कंपन्यांचे शेयर्स राईट इश्शुच्या माध्यमाने खरेदी करुन संभावित टेकओव्हर्सपासुन त्यांनी कंपनीचा बचाव केला.
- १९९६ मध्ये त्यांनी समुहाची एक ‘ब्रॅन्ड एंब्रेला’ बनवली. प्रत्येक उपकंपनीला टाटा नावाचा उपयोग करण्यासाठी रॉयल्टी आकारली.
- त्यांच्या प्रत्येक निर्णयाने टाटा सन्स गतिमान झाली, मजबुत झाली, अभेद्य झाली,
३. ब्रॅन्डवर लक्ष्य द्या, प्रणालीमध्ये सुधार करा आणि सेवा वाढवा –
- आपल्या कारकिर्दीच्या वीस वर्षाच्या काळात रतन टाटांनी नव्या बत्तीस कंपन्याची निर्मिती करुन नवनवीन व्यापार क्षेत्रामध्ये प्रवेश केला.
- समुहाला अधिकाधिक ग्राहक मिळवुन देण्यासाठी त्यांनी जबरदस्त गुंतवणुकी केल्या, व झटपट रिझल्टस ची वाट न बघता दिर्घ मुदतीच्या रचना केल्या.
- रतन टाटांनी सर्वात प्रथम आपल्या कोअर टीमला जास्त प्रोडक्टीव्ह आणि अधिक प्रोफेशनल केलं.
- आता कर्मचार्यांमध्ये आपोआपच संदेश गेला की टाटा समुहात ‘चलता है’ वृत्ती यापुढे चालणार नाही.
४. हे विश्वची माझे घर –
- टाटा भारतात नंबर होतीच, पण रतन टाटा तेवढ्याने संतुष्ट नव्हते, त्यांना टाटा समुहाचे आस्तित्व जगाच्या नकाशावर उमटावयाचे होते.
- सर्वात प्रथम त्यांनी सिंगापुरच्या नैट स्टील आणि थायलंडच्या मिलेनियम स्टीलला खरेदी केले.
- नंतर त्यांनी टाटास्टील पेक्षा तिपट्ट मोठ्या असणार्या इंग्लंडमधल्या कोरस कंपनीला एका महागड्या सौद्यामध्ये खरेदी केले.
- पुढे त्यांनी युकेच्या चहा बनवणार्या जगातल्या सर्वात मोठ्या टेटली कंपनीलाही खरेदी केले.
- टाटा टी साठी अमेरीकेतली गुडअर्थ कार्पोरेशन आणि चेक गणराज्याची जेमका, ह्या कंपन्याही आपल्या आधिपत्याखाली आणल्या.
- रतन टाटांना सर्वात जास्त टिकेचे धनी व्हावे लागले जेव्हा त्यांनी तोट्यात चालणार्या लॅंडरोव्हर जॅक्वार कंपन्यांची खरेदी केली.
- ह्यासाठी त्यांनी खुप मोठी पुंजी उधार घेतली होती आणि ह्या घटनेनंतर लगेचच विश्व अर्थव्यवस्था मंदीच्या जाळ्यात अडकली.
- लोक म्हणाले, रतन टाटांचा टायमिंग चुकला, पण रतन टाटांनी काळाच्या कसोटीवर त्यांचा प्रत्येक निर्णय एकदम बरोब्बर ठरवला.
प्रत्येक व्यावसायिकाच्या आयुष्यात चढउतार येतातच, पण चढत्या काळात मिळालेल्या यशाने हुरळुन न जाता जो निष्ठेने काम करत राहतो आणि पडत्या काळात आत्मविश्वास न गमवता जो संपुर्ण ताकतीने लढत राहतो, तोच खरा लढवय्या उद्योजक!
रतन टाटा हे ही असेच एक रत्न आहेत!
------------------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ
Work From Home Jobs
---------------------------------
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे.
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
Join | Learn | Share | Earn
------------------------------------
e4 team
(पोस्ट कॉर्नर +)™ ग्रृपला जॉईन होण्यासाठी खालील नावावर क्लिक करा
पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा

