Skip to main content

नागपंचमी हा सण का साजरा केला जातो?


आज नागपंचमी !

जाणून घेऊया पूजा विधी आणि नियम



नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नाग पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नाग दैवताची पूजा केली जाते.


श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


काय आहे आख्यायिका :

कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.


अनंत, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची या दिवशी पूजा केली जाते. तसेच भारतात काही ठिकाणी जिवंत नागांचीही पूजा केली जाते.


पुराणातील काही आख्यायिकांमुळे यादिवशी शेतकरी शेत नांगरत नाही.


स्त्रिया आणि नागपंचमी :

पंचमीच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात.

पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची हौसही स्त्रिया या सणाच्या निमित्ताने पूर्ण करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत स्त्रिया पाळतात.


पुजा विधी :

या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य कर्मांहून निवृत्त व्हावे. अंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे, अलंकार धारण करावे.

पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढावी. त्यांची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करावी. नाग देवताची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.


नागपंचमीचे नियम :

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते.

लेखक : रसुल खडगाळे

----------------------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही)

या 20,000+ सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळते!
e4 service
E-mail : e4service4u@gmail.com
8007219237

Start Your Freelancing Career With 
e4 Team
----------------------------------------------------
Copyright © e4 service