आपण आपल्या मोबाईलची बॅटरी सकाळी पूर्ण चार्ज करून घेतलेली असते. दिवसभर आपला मोबाईलचा वापर मुक्तहस्ताने सुरू असतो. बॅटरी किती शिल्लक आहे, याकडे आपले लक्षही जात नाही. पण जेव्हा रात्री एखादा महत्त्वाचा निरोप द्यायला कॉल करण्यासाठी बॅटरी पुरेशी शिल्लक नसते, तेव्हा आपले डोळे उघडतात. आपल्याला वाईट वाटते.
अशीच अवस्था आपल्यापैकी अनेकांच्या खात्यात बचत रक्कमेची (savings) असते. काही महत्त्वाचा, अचानक आलेला खर्च करण्यासाठी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक च नसते. कारण महिना संपता संपता अनेक जणांचा पगार सुद्धा अस्सा संपलेला असतो की लक्षातच येत नाही. महिन्याची १ तारीख आणि शेवटची तारीख हसत हसत आनंदाने भेटल्या, असे फार कमी जणांचे होते. मग काही इमर्जन्सी खर्च उद्भवला तर इतरांकडे हात पसरायची वेळ येते. अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर त्यासाठी काही ठोस पावले ही उचलायलाच लागतात.
बचतीचा गिरनार चढावा तरी कसा?
- गिरनार पर्वत चढायला जातो तेव्हा आपल्याला माहित असतं की १०००० पायऱ्या आहेत, चढायला वेळ लागणार आहे. तरीसुद्धा आपण जुनागढलाच आराम करत राहिलो तर? किंवा पायथ्याशी जाऊन तिथेच रेंगाळलो तर? होईल का गिरनार चढून? नाही नं… पहिल्या पायरीवर पाऊल टाकून एकेक पायरी चढत गेल्याशिवाय गुरुशिखर कसं गाठणार?
- आपल्या बचत वा सेविंग्सच्या बाबतीत पण हे असंच असतं. महिनाअखेर आपला खिसा रिकामा असू नये असंच प्रत्येकाला वाटत असतं, म्हणूनच आपल्या खिशातील वा खात्यातील ही तूट भरून काढण्यासाठी आपल्या उत्पन्नातील काही रक्कम आपण बाजूला काढली पाहिजे. मात्र हे नियमितपणे झाले पाहिजे.
- प्रत्येकालाच हाता तोंडाची गाठ घालायची असते. त्यामुळे एकाच वेळी फार मोठी रक्कम बाजूला काढणे, शिल्लक ठेवणे शक्य होत नाही. ते अगदी स्वाभाविक आहे. म्हणूनच प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम बाजूला काढून ठेवावी.
कशी करावी बचत?
- साधा सरळ हिशोब केला तर बचत म्हणजे आपले उत्पन्न आणि आपला खर्च यांची वजाबाकी. आपल्या महिन्याच्या उत्पन्नातून आपला महिन्याचा खर्च वजा केल्यावर जी काही रक्कम उरेल ती असेल आपली बचत.
- उत्पन्न – खर्च = बचत . आपण बरेचजण साधारणपणे असंच करतो की !
- महिन्याचा पगार वा आपले उत्पन्न म्हणून जे काही पैसे हातात येतात त्यातले काही पैसे आपण महिन्याच्या खर्चाला वापरतो. रोजचं अन्न धान्य, भाजीपाला, फळ- फळावळ, दूध, औषधं, प्रवास खर्च… एक नाही अनेक खर्च असतात महिन्याचे.
- हे सर्व खर्च आपण करतो. असे खर्च केल्यानंतर आपल्या कमाईतले जे काही पैसे उरतील ते आपण शिल्लक म्हणून, बचत वा सेविंग्स म्हणून बाजूला ठेवतो.
- या प्रकारात होतं काय, आपला जवळजवळ पूर्ण १००% वा ९८-९९% पगार, उत्पन्न खर्च होऊन जातं. आता शिल्लक टाकायला राहिलं काय ??
- लक्षात घ्या की या प्रकारात आपण महत्व आपल्या खर्चाला दिलंय. मिळालेल्या कमाईमधून हवा तेवढा, लागेल तसा खर्च केला आहे आणि काही रक्कम उरली तर आपण ती रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवणार आहोत. अशामुळे आपली पुरेशी बचत होत नाहीये आणि आपल्या खात्यातील शिल्लक काही समाधानकारक वाढत नाहीये.
- इथेच तर खरी मेख आहे…
- “उत्पन्न – खर्च = बचत ” हा फार्मुला इथेच गडबड करतोय.
- मग काय हवा फॉर्म्युला? काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?
- “उत्पन्न – बचत = खर्च” √
- आपण जेव्हा हा बचतीचा आधुनिक फॉर्म्युला वापरून पैसे वापरायला लागू तेव्हा खरी बचत सुरू होईल. म्हणजे काय करायचं? तर, महिन्याला पगार म्हणून, आपली कमाई म्हणून जी काही रक्कम आपल्या हातात, आपल्या खात्यात येते ती खर्चाला वापरायच्या आधीच एक काम करायचं. त्या रकमेतली काही ठराविक रक्कम, समजा १०%, बचत म्हणून बाजूला काढून ठेवायची.आता उरलेल्या ९०% मध्ये महिन्याचा खर्च भागवायचा.
- यामुळे प्रत्येक महिन्याला १०% रक्कम अगदी नक्की बाजूला ठेवली जाईल. खर्चाला ९०% च रक्कम हातात आहे हे एकदा मनाला पटलं की आपली खर्च करण्याची सवय सुद्धा बदलेल. मग सवयीने आपण खर्च मोजून मापून करायला लागू. ज्यामुळे हळूहळू खर्च कमी आणि बचतीचे प्रमाण वाढायला लागेल.
- बचत वाढवण्यासाठी उत्पन्न वाढवणे गरजेचे आहेच. पण तेवढेच गरजेचे आहे की बचत ही ठरवून नियमितपणे केली पाहिजे. खर्च होऊन उरलेली रक्कम बचत न करता, बचतीसाठी रक्कम बाजूला काढून नंतर खर्च केला पाहिजे. यातूनच आपल्या खात्यातील शिल्लक हळूहळू वाढत जाते आणि आपण वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांचा विचार करू शकतो.
- यासाठी एक उपाय म्हणजे बँकेमध्ये आवर्ती ठेव खाते (Recurring account) अर्थात आरडी सुरू करणे. ज्यामुळे आपण न चुकता काही रक्कम नियमितपणे बाजूला ठेवतो.शेवटी.. थेंबे थेंबे तळे साचे.
हा बचतीचा आधुनिक फॉर्म्युला वापरून निदान काही महिने तरी बचत करून बघा. तुमच्या बचतीची रक्कम नक्की वाढलेली असेल.



