आज राजमाता जिजाऊ यांची जयंती!
आज प्रत्येक आईने तिच्या मुलांना राजमाता जिजाऊंच्या विचारांची शिकवण द्यायला पाहिजे. जिजाऊंनी शिवबाला बालवयात जे शिकवलं ते आपल्याला शिवचरित्र वाचल्यानंतर लक्षात येतं. शिवबांनी आईने दिलेल्या उपदेशांचे पालन करून एक बलशाली मराठा साम्राज्य उभे केले.
एवढे मोठे साम्राज्य उभं करत असताना महाराजांना अनेकदा यश अपयश आले, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, न डगमगता चारी बाजूने असणाऱ्या शत्रूंशी दोन हात करून अनेक लढाया लढाव्या लागल्या. अशाप्रकारे शून्यातून महाराजांनी एक मोठे बलाढ्य आणि समृद्ध मराठा साम्राज्य उभे केले.

तर आपणही आपले जीवन जगत असताना, आपले स्वप्न, आपले ध्येय मिळवत असताना अनेक समस्यांना, अडचणींना तोंड देत असतो. अशा वेळेस आपण राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून काय शिकायला पाहिजे, ते बघुयात!
१) सुरुवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका
रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवबा सोबत फक्त आठ-दहा मावळे होते.
२) शून्याला घाबरू नका
पूर्णपणे भकास झालेले पुणे परगणा महाराजांच्या वाट्याला आले होते. त्यातूनही त्यांनी अथक परिश्रमांनी समृद्ध स्वराज्य उभे केले. नसलेल्या गोष्टींचा त्रागा करण्यापेक्षा उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर करण्यावर भर दिला.
३) यशाचा आणि वय, अनुभवाचा संबंध नसतो
महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी तोरणगड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुगल, निजाम, आदिलशहा असे कसलेले विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापले होते.
४) सहकारी चांगले निवडा
आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हणत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती.
५) संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा
अफझलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने अमलात आणला होता.
६) नियोजनबद्ध काम करा, अंमलबजावणी योग्य प्रकारे करा
पुण्याला वेढा घालून बसलेल्या शाहिस्तेखानाला महाराजांनी नियोजनबद्ध रीतीने पराभूत केले होते. प्रत्येक कामाची योग्य आखणी करून कृती अमलात आणली होती.
६) संकटकाळी धीर सोडू नका, शांतपणे निर्णय घ्या.
पन्हाळ्याच्या वेड्यात सगळीकडून अपयश येत असतानाही महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले.
७) सगळं संपलं आहे असं ज्यावेळी वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा.
पुरंदरच्या तहात मुघलांना २३ किल्ले दिल्यानंतर स्वराज्य संपले असेच सगळ्यांना वाटले होते....
महाराज वगळता....
८) स्वाभिमानी रहा, आत्मसन्मान आवश्यक आहे
आग्र्यात औरंगजेबाच्या दरबारात आपल्या अपमान विरोधात बोलण्याची हिम्मत महाराजांनी दाखवली होती.
९) नैतिकतेने, नियमाने वागा, सहकाऱ्यांनाही शिस्त लावा
महाराजांचे नियम स्वतः महाराज सुद्धा मोडत नसत. अगदी जवळच्या सहकाऱ्यांना सुद्धा नियम भंगाच्या शिक्षेत माफी नसे. स्वराज्य स्थापनेत स्वयंशिस्तीचा वाटा मोठा होता.
१०) स्वतःचे अस्तित्व दाखवण्यात कोणतीही कसर ठेवू नका
राज्याभिषेक फक्त जनतेसाठी नव्हता, तर देशातील तमाम अन्यायकारी राजांना कल्याणकारी स्वराज्याचे अस्तित्व दिमाखात दाखवले गेले होते.
११) जबाबदाऱ्यांचे वाटप करा
महाराज कोणत्याही मोहिमेवर जाताना तसेच इतर वेळीही जबाबदारीचे योग्य वाटप करत. यामुळे कामात सुसूत्रता राही.
१२) वेळ प्रसंगी कठोर निर्णय घ्यायला कचरू नका
स्वराज्य हितासाठी महाराजांनी अनेक कठोर निर्णय घेतले. प्रसंगी आपल्या आप्तेष्टांना विरोधात सुद्धा निर्णय घेताना डगमगले नाही.
१३) लोकांना आपलेसे करा
लोकांशी फटकून वागून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. महाराज जनतेसोबत वागताना त्यांच्यातलेच होउन जात, अगदी घरातले सदस्य असल्यासारखे.
१४) रागाच्या भरात कोणतीही कृती करू नका
महाराजांनी कधीही रागाच्या भरात कोणती कृती केली नाही. यामुळेच त्यांच्यावर आपल्या कोणत्याही कृतीचा पश्चाताप करण्याची वेळ कधीही आली नाही.
१५) इतरांच्या मतांचा आदर करा
महाराज नेहमी सर्व सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून मगच निर्णय घेत. इतरांच्या मतांचा हि आदर करत. स्वराज्यासाठी योग्य तोच निर्णय घ्यायला प्राधान्य देत.
१६) संयम ठेवा
कितीही मोठं संकट असलं तरी महाराज आपला तोल ढळू देत नसत. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर पुढच्या मोहिमेसाठी महाराजांनीही घाई गडबड न करता चार वर्षे वाट पाहिली होती. तोपर्यंत ते कागदोपत्री औरंगजेबाचे मनसबदार म्हणून काम पाहत होते.
१७) सहकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर वचक असायलाच हवा
महाराजांच्या परस्पर कोणताही निर्णय घेण्याची हिम्मत कुणातही नसे. महाराजांनी ठरवून दिलेल्या नियमा बाहेर कुणीही जात नसे. यामुळे कामावर योग्य अंकुश राहत असे.
१८) मनाचा ठाव घ्या
समोरच्याला काय हवय हे महाराजांना नेमकं समजायचं. यामुळेच ते कोणत्याही व्यक्तीला तात्काळ आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी होत.
१९) समाजशील असा
महाराज जितके कठोर होते तेवढेच दयाळू आणि क्षमाशीलही होते. महाराजांचे या स्वभावामुळेच कित्येक विरोधकही त्यांचे जवळचे सहकारी बनले होते.
२०) माघार घेणे सुद्धा काही वेळेस आवश्यक असते
महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत. या मुळे होणारे नुकसान टळे आणि नव्याने तयारी करण्याची संधी मिळे, यात कोणताही कमीपणा नाही.
E4 Team
(पोस्ट कॉर्नर +)™
E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तुमच्या मित्रांना शेअर करा👏👏
तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.
E4 Team
---------------------------------------------
Join Whatsapp Group
