Skip to main content

निर्णय कसा घ्यावा?


2344_1591843017EcswZz.jpeg

रोजच्या जीवनात आपल्यावर अनेकदा असा प्रसंग येतो तेव्हा नेमका काय निर्णय घ्यावा हेच कळत नाही.


आपल्यासमोर दोन किंवा त्यापेक्षा अधिक पर्याय किंवा मार्ग उपलब्ध असतात त्यामुळे आपण अडचणीत येतो आपण घेतलेला निर्णय चुकीचा ठरला तर त्याचा परिणाम पैशांवर, नोकरी किंवा व्यवसाय आणि मुख्यत्वे वेळेवर होऊ शकतो यासाठी योग्य तो विचार करूनच निर्णय घेतला जाणे महत्त्वाचे आहे.




योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला यशाच्या शिखरावर नेत असते. 


आपल्या आयुष्याचे मागचे दहा वर्षे चाळून पहा... आपल्या आयुष्यात कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत ज्या आपण योग्य वेळी निर्णय घेतला असता तर त्यावेळचे परिणाम खूप वेगळे आणि आपल्या आयुष्यावर खूप चांगले परिणाम करणारे ठरू शकले असते असं वाटतं...

तेव्हा वेळ होती, पण उशीर झाला किंवा घाईगडबडीत निर्णय चुकला नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती असं कित्येक बाबतीत आपल्याला वाटत असते.


खरं हे आपल्या कमकुवत निर्णयक्षमतेचे परिणाम आहेत. मला स्वतःला निर्णय घेण्यात उशीर केल्यामुळे बऱ्याचदा चांगलेच नुकसान झालेले आहे. आत्ताही कधीमधी चूक होते पण ती तितकीशी मोठी नसते. सात आठ वर्षांपूर्वी निर्णय घेण्यात ज्या काही मोठ्या चुका झाल्या त्यातून शिकून मी शक्य तेवढे लवकर निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे.   


आपण इतरांच्या यशाला नशिबाचा भाग म्हणतो आणि त्याच्या निर्णयक्षमतेला दुर्लक्षित करतो. खरं तर ते यश योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मिळालेले असते. त्यांच्या यशाला नशिबाचे कोंदण लावल्यामुळे निर्णयक्षमतेचे महत्व आपल्या लक्षातच येत नाही. 


व्यवसायात आणि आयुष्यामध्ये आपल्याला कित्येकदा तात्काळ निर्णय घ्यायचे असतात. अशावेळी ही निर्णयक्षमता चांगली असणे आवश्यक आहे. 


'निर्णय घेऊ का नको'

किंवा

'काय निर्णय घेऊ'

असं कन्फ्युजन होत असेल, किंवा प्रत्येक वेळी कुणीतरी आपल्या निर्णयाला समर्थन देण्याची आवश्यकता भासत असेल, किंवा कुणाशी तरी चर्चा केल्याशिवाय आपल्याला कधीच अंतिम निर्णयाप्रत येणं शक्य होत नसेल, किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीवर ठाम निर्णयच घेता येत नसेल तर आपल्याला आपली निर्णयक्षमता सुधारण्याची खूप आवश्यकता आहे.

करिअर घडवताना आणि व्यवसाय करताना खुप महत्वाचे निर्णय घेण्याची गरज असते, अशावेळी कमकुवत निर्णयक्षमता तुमचे बरेच नुकसान करू शकते.


निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करावा, योग्य अयोग्यतेच्या कसोट्यांवर सर्व बाजू तपासून पाहाव्यात, चांगल्या वाईट परिणामांचा अंदाज घ्यावा, वाईट परिणामांना सामोरे जाण्याची तयारी करावी, आणि मग निर्णय घ्यावा... निर्णय घेतल्यानंतर मागे फिरायला पुन्हा संधी नसते. आणि घेतलेले निर्णय योग्य आहे हे तुम्हाला सिद्ध करून दाखवण्याचे दडपणही असते. 


काही वेळेस निर्णय घेण्यासाठी वेळच नसतो. आत्ता काय ते ठरवायचं आहे अशी वेळ येते. अशावेळी त्या क्षणाला जे योग्य वाटेल तो निर्णय घेऊन मोकळं व्हावं लागतं. तिथे गडबड झाली, गोंधळ उडाला, निर्णय घ्यायला उशीर झाला तर हातची संधी जाऊ शकते. 


निर्णयक्षमता डेव्हलप होत असते ती मागच्या निर्णयांमधून शिकून, इतरांच्या यशापयशाची उदाहरणे तपासून, आसपास घडत असलेल्या घटनांचा अभ्यास करून आपण आपली निर्णयक्षमता वृद्धिंगत करावी.


आणि अजून एक गोष्ट अशी की आपल्यापैकी बरेच जण निर्णय घेण्यासाठी घाबरतात. कारण आपल्याला भीती वाटते की आपण अपयशी झालो तर, लोकांनी नाव ठेवले तर...


परंतु माझं मत असं आहे की आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणताच निर्णय न घेतल्यापेक्षा कोणतातरी निर्णय घेतलाच पाहिजे.

जर निर्णय योग्य असेल तर फायदाच होईल आणि चुकीचा ठरला तर एक अनुभव येईल ज्यातून आपण पुन्हा ती चूक करणार नाही.


 
  कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी स्वतःला प्रश्न विचारावा की

आपल्या मित्राला किंवा नातेवाईकाला जर तो अशाच अडचणीत किंवा परिस्थितीत असेल आणि त्याचा निर्णय घेण्यासाठी जर तो मला सल्ला मागत असेल तर मी त्याला काय सांगेल. 

तर तेच उत्तर तुम्हाला पण लागू असेल कारण आपण आपल्या जिवलग व्यक्तींना कधीच चुकीचा सल्ला देणार नाही.

Sachin Sir, HR Executive

E4 Team



(पोस्ट कॉर्नर +)™

E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!


तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.

E4 Team

---------------------------------------------